Uncategorized

उत्तुर बस स्थानकाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

उत्तुर ता. आजरा या भागातील २५ हून अधिक गावांचे केंद्र आहे. वाढलेल्या लोकसंख्या विस्तारासह बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका व शाळा-महाविद्यालये या गावात आहेत. येथे मोडकळीस आलेले पिकप शेड आहे. या ठिकाणी सुसज्ज व अद्ययावत बस स्थानक होणे गरजेचे आहे. हे बस स्थानक होण्याच्या दृष्टीने कोल्हापुरात कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. उत्तुर गावाच्या प्रवेशद्वाराजवळच आरोग्य केंद्राच्या उर्वरित जागेपैकी पाच गुंठे जागा व या जागेला जोडूनच असलेली ग्रामपंचायतीच्या मालकीची पाच गुंठे जागा, असे एकूण दहा गुंठे जागेमध्ये प्रस्तावित एस. टी. बस स्थानकाची ग्रामस्थांची मागणी आहे.

बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांनी नवीन बसस्थानक होण्याविषयी भूमिका मांडली. कोल्हापूरवरून उत्तूरमार्गे आजरा तसेच पुढे आंबोली, सावंतवाडी व कोकणात ये-जा होणारी वाहतूक, गडहिंग्लजवरून गारगोटीकडे ये-जा होणारी प्रवासी वाहतूक व बस स्थानकाचे महत्त्व स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत उत्तूरच्या प्रवेशद्वाराजवळच सुसज्य व अद्ययावत प्रशस्त असे बसस्थानक होणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी त्यांनी केली. मंत्री श्री. मुश्रीफ तातडीने अधिकाऱ्यांना जागेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उर्वरित जागेपैकी पाच गुंठे जागा बस स्थानकासाठी देण्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.

यावेळी उत्तूर विभागाचे प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आजरा पंचायत समितीचे माजी उपसभापती शिरीषभाऊ देसाई, आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक महादेवराव पाटील, उत्तूरचे सरपंच कीरण आमनगी आदी उपस्थित होते. तसेच; बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . संजय रणवीर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, आजरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे उपस्थीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks