भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रोडवर कार ओढ्यात कोसळून दोघा तरुणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रोडवर अनफ खुर्दमध्ये कार ओढ्यात कोसळून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. आदिल कासम शेख (वय 19) आणि झहीर शेख (वय 19, रा. दोघेही अनफ खूर्द, ता. भुदरगड) अशी मृत तरुणांची नावे आहेत. आज (28 जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात अन्य एक तरुण जखमी झाला आहे. साहील मुबारक शेख असे त्याचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर या मार्गावर रहदारी नसल्याने मदतीसाठी उशीर झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ओढ्यामध्ये उतरून जखमींना बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांमध्ये झाली आहे.
भरधाव कारवरील ताबा सुटला…
मिळालेल्या माहितीनुसार आदिल शेख मित्र झहीर आणि साहील कारने (एमएच-12-6550) कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट जाऊन ओढ्यात कोसळली. कार ओढ्यात कोसळल्यानंतर झहीरचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या अदिलला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. साहीलवर गारगोटीत उपचार सुरु आहेत. मृत आदिल हा एकूलता एक असल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.