गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

निपाणीतील युवकाचा भुदरगड येथे संशयास्पद खून

निपाणी येथील युवकाला घरातून बोलावून घेऊन जाऊन किल्ले भुदरगड येथे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. राहुल शिवाप्पा सुभानगोळ (वय ३२ रा. मुळ गाव मसोबा हिटणी ता. हुक्केरी, सध्या रा. हौसाबाई कॉलनी साखरवाडी, निपाणी) असे या युवकाचे नाव आहे. या खुनामध्ये मुंबई आणि निपाणी येथील एकाचा समावेश असल्याचा संशय निपाणी आणि भुदरगड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सोमवारी (ता.२) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहुलच्या दोघा मित्रांनी घरातून बोलावून दुचाकीवरून घेऊन गेले होते. पण रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी रात्री १ वाजता निपाणी शहर पोलिसांशी संपर्क साधला. मंगळवारी (ता.३) सकाळी पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला असता किल्ले भुदरगड येथे राहुलचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

म्हसोबा हिटणी येथील राहुल सुभानगोळ यांने काही वर्षांपूर्वी फायनान्स कंपनीमध्ये मुंबई, बेळगाव परिसरात काम केले होते. त्यानंतर अलीकडच्या काळात एका नामवंत कंपनीच्या बेकरी उत्पादचे मार्केटिंग करीत होते. त्यांना एक मुलगी असून ती सतत आजारी असल्याने तिच्यावर निपाणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे आपल्या आई-वडिलांना म्हसोबा हिटणी येथे येथे सोडून तो आपल्या पत्नीसह मुलीला घेऊन येथील साखरवाडी मधील हौसाबाई कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता.

सोमवारी (ता.२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या दोघा मित्रांनी बोलावल्याने तो त्यांच्या दुचाकीवरून गेला होता. पण तो परत न आल्याने पोलिसात याबाबतची माहिती पत्नी व नातेवाईकांनी दिली होती. मंगळवारी (ता.३) सकाळी त्यांच्या मोबाईल वरील लोकेशननुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी किल्ले भुदरगडच्या पायथ्याशी राहुलचा मृतदेह आढळून आला. यावेळी भुदरगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र म्हस्के, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी राहुल याच्यावर चाकूचे वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. निपाणी शहर पोलीस ठाण्यात अपहरण तर भुदरगड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत राहुल याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

किल्ल्यावर खुनाचा संशय
दोघा मित्रांच्या बरोबर दुचाकीवरून गेलेल्या राहुलला थेट भुदरगड किल्ल्यावर घेऊन गेले असावेत. तेथे खून करून किल्ल्यावरून मृतदेह खाली फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकेशनवरून मृतदेहाचा शोध
किल्ले भुदरगड परिसर जंगल झाडांनी वेढलेला आहे. याच ठिकाणी खून करून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न संशयतांनी केला होता. यावेळी त्यांनी राहुल याच्या खिशातील मोबाईल तसाच सोडून गेला होता. त्यामुळे लोकेशन वरून राहुलचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

निपाणीचा संशयित कोण?

या खुनामध्ये मुंबई आणि निपाणी मधील दोघेजण संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निपाणी चा संशयित कोण याबद्दलची चर्चा शहरात सुरू झाली आहे. तर मुंबईमधील संशयित हा सुपारी घेणारा की, आर्थिक देवान-घेवाण करणारा आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks