ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते ! शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

कोल्हापूर प्रतिनिधी :

जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील सवजियानमध्ये 13 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीमधील अवघ्या 20 वर्षीय ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्याच ऋषीकेश यांच्या कुटुबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याचे समोर आले आहे.

शहीद ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांनी ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तत्रय शंकरनाथ डवरी यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना शहीद ऋषीकेश यांचे वीर वडील रामचंद्र हरी जोंधळे तसेच आई कविता रामचंद्र जोंधळे यांनी पत्र लिहून ग्रामसेवक डवरींपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्राची प्रत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनाही पाठवली आहे.

तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते. ज्या तिरंग्यातून मुलाचे पार्थिव आले तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावल्याचा आरोप वीर माता पित्यांनी केला आहे. गावामध्ये बदनामीकारक डिजिटल उभा करून कुटुबांची बदनामी केल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत ?

मी (ऋषीकेश यांचे वडील) सध्या बहिरेवाडी येथे राहण्यास असून माझ्या घरासमोरील राजेंद्र उर्फ दत्तत्रय शंकरनाथ डवरी (मुम्मेवाडी ता. आजरा) येथे ग्रामसेवक आहेत. हे मला व माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास देत आहेत. राज्यभरातून लोकप्रतिनिधींसह अनेकजण घरी भेट देत असल्याने डवरीला या गोष्टी खटकत आहेत. त्यामुळे तो वारंवार माझ्या कुटुंबाचा अपमान करीत आहे.
1 जून रोजी डवरीने माझ्याबरोबर नाहक वाद घातला. तुझ्या मुलग्याला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते ? असे अपशब्द वापरुन त्याने माझा व देशासाठी लढणाऱ्या असंख्य जवानांचा अपमान केला आहे. ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडी आणला गेला. तो तिरंगा ध्वज मी माझ्या अंगणात उभा केला होता. डवरीने तो ध्वजही मला बळजबरीने काढायला लावला.

कुटुंबीयांची बदनामी होईल असा बोर्ड लावला….

माझ्या घराचे बांधकाम चालू असताना डवरी बांधकाम कामगारांनाही नाहक त्रास देत होता. त्याच्या घराच्या बांधकामाचे साहित्य त्याने माझ्या घरासमोर आणून टाकले होते. ते साहित्य काढून घेण्याची विनंती केली असता त्याने उलट आम्हालाच शिवीगाळ केली. आमच्या विरोधामध्ये खोटी तक्रार केली. त्यामुळे देशसेवेसाठी लढणाऱ्या माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे.
माझा एकुलता एक मुलगा अगदी कोवळ्या वयात देशासाठी शहीद झाल्यानंतर माझ्या कुटुंबाचा आधार गेला आहे. अशावेळी डवरी मात्र माझ्या कुटुंबाचा जगण्याचाच अधिकार काढून घेत आहे. गेल्या आठवड्यात त्याने भरचौकात माझ्या कुटुंबीयांची बदनामी होईल असा बोर्ड लावला आहे. यामुळे आमचे मानसिक खर्चीकरण झाले आहे. रात्री उपरात्री तो शिवीगाळ, आंगावर धावून येणे असे प्रकार करत आहे. यामुळे माझे कुटूंब पूर्णपणे असुरक्षित बनले आहे.
एकीकडे ऋषिकेश जोंधळे शहिद झाल्यानंतर सरकार व समाजातून माझ्या कुटुंबियांला मोठा आधार दिला गेला. मात्र, डवरी आमच्या कुटुंबियांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे माझ्या पत्नीसह माझी मुलगीही भयभीत झाली आहे. डवरीपासून आमच्या जिवीताला धोका आहे. तो प्रशासकिय सेवेत असल्याने पदाचा वापर करुन आमच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे डवरीपासून आम्हाला संरक्षण मिळावे.

ग्रामसेवक डवरी यांच्याकडून अपमानास्पद डिजिटल फलक….

दरम्यान, ग्रामसेवक राजेंद्र डवरी प्रेमी मित्र मंडळ असा सौजन्य असलेल्या बोर्डवर राजेंद डवरी भले मोठे कौतुक करणारे शब्द लिहिले आहेत. त्या फलकावर राजेंद्र शंकरनाथ डवरी यांच्यावर 1 जून 2022 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रामचंद्र हरिबा जोंधळे, लक्ष्मण हरिबा जोंधळे, पुंडलि सदाशिव जोंधळे आणि दीपक सदाशिव जोंधळे या चार हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. सोबत राजेंद्र डवरी यांचा जखमी असलेला फोटो आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks