ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“स्वराज्य सौदामिनी ताराराणी”च्या भुमिकेसाठी तब्बल 400 ऑडिशन्समधून या अभिनेत्रीची निवड करण्यात आली

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टीझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेत कोणते कलाकार भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ अशी ताराराणींची निष्ठा होती. करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. यात स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वरदा ही ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण आहे. या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणाऱ्या अपरिचित इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks