जीवनमंत्रताज्या बातम्यासामाजिक

विशेष लेख :: “मी सर पिराजीराव तलाव बोलतोय…”

शब्दांकन : व्ही.आर. भोसले

 

सायंकाळी साडे सहाची वेळ .मुरगुडच्या पूर्वेला असलेला सर पिराजीराव तलाव अतिशय शांत होता .त्याच्या चारी काठावरून माणसं फिरत होती .

थोडकयात ‘एव्हनिंग वॉक ‘करत होती .
मार्च महिना निम्म्यावर आल्याने तलावाचे पाणी बरेच खाली गेले होते .
फिरायला आलेल्या माणसांना तो तलाव व्याकुळतेने कांहीतरी सांगत असावा असा भास त्या संध्यासमयी होत होता .

शाळकरी पोरांना निबंधाचे विषय असतात .’मी नदी बोलते ‘, मी वृक्ष बोलतोय ,मी सैनिक बोलतोय ,वगैरे .
तसा  ‘मी सर पिराजीराव तलाव बोलतोय’  असंच ते दृश्य होत .

 

दहाबारा पोरं तलावात ट्रॅक्टर धूत होती .अगदी दिवाळीची अंघोळ घालावी तशी त्याची धुलाई चालू होती .चाकांचा चिखल आणि इंजिनचं तेल पाण्यात स्वाहा होत होत .
कांही पोर पलीकडे बैल घेऊन पाण्यात डुंबत होती .
कांही पोर कपडे काढून पाण्याच्या काठावर बसली होती.
त्यात एकाला शू करायची होती .

रस्त्यावर माणसं असल्यानं त्याला बाहेर ते जमणार नव्हतं .
त्यानं सरळ दुसरा मार्ग निवडला .तो पाण्यात पडला .
त्यानं लघुशंका कोठे केली असावी हे वेगळं सांगायची गरज नाही .

पाण्याच्या काठावर दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या .कांही फुटल्या होत्या. त्या जणू सांगत होत्या ,

“आमची जागा ही नाही .बार किंवा दारू दुकानात आम्ही रहातो ,पण टवाळ पोरांनी आम्हांला इथं आणलं ,नाच नाच नाचली आणि आम्हांला रिकामं करून इथंच टाकून गेली .”

 

 

अशा कितीतरी प्रकारच्या बाटल्या तेथे पडल्या होत्या. कांही सेवाभावी तरुण पोरांनी पोती भरून बाटल्या उचलून आणल्या .पेपरात बातम्या आल्या पण पुढे कारवाई कांही झालीच नाही .
कोणावर कारवाई करणार आणि कोण करणार ?

हा तलाव कागलकर घाटगे सरकार यांच्या खाजगी मालकीचा आहे असे ऐकिवात आहे .त्याची देखभाल करणारी एक’ कमिटी’ पण आहे.
अत्यंत महत्वाचे म्हणजे या तलावाचे पाणी फक्त शेतीलाच नाही तर मुरगुडच्या नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते .शेती आणि पेयजल ही टक्केवारी नव्वद व दहा अशी असावी .

अख्ख शहर या तलावाचे पाणी पीत असल्याने मुरगुड नगरपरिषदेवर देखील मोठी जबाबदारी आहे .

तलावात गणेश मूर्तींचे दरवर्षी विसर्जन होते .काठावरच्या पार्ट्या ना बंधन नाही .तलावाला सर्व बाजूनी कुंपण किंवा खंदक नाही .

चोविस गुणिले सात तासांचा पहारा असायला हवा .तोही नाही ,.

हा तलाव म्हणजे कांहीं कोल्हापूरचा रंकाळा नाही .रंकाळ्या चे पाणी पिण्याकरिता वापरले जात नाही ,.तो तलाव फक्त शहराचे दर्शनीय वैभव वाढवतो .

मुरगुड चा सर पिराजीराव तलाव मात्र पंधरा हजार नागरिकांचे आरोग्य जपतो .
नुसते आरोग्य नव्हे तर जीवनही जपतो .
नागरिकांच्या जीविताशी होणारा हा क्रूर खेळ थांबलाच पाहिजे .आता नगरपरिषदेच्या निवडणुका येऊ घातलेत .

ज्या नगरपरिषदेचा स्वच्छता अभियानात दिल्लीने गौरव केला आहे तिच्या लौकीकाचा ही प्रश्न आहे .
तलाव अस्वच्छ करणाऱ्यांना कायद्याचा चाप लावला पाहिजे किंवा स्वच्छ शुद्ध पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे .अर्थात हे काम एकट्या नगरपरिषदेचेही नाही .तर तलावाचे पाणी पिणाऱ्या नागरिकांचेही आहे .
स्वच्छता व आरोग्य यांचे महत्व कोरोनाने शिकवले आहे .
ही जाणीव जागृती नागरिकांत झालीच पाहिजे .
रेल्वेत एक ठळक घोषवाक्य लिहिलेले असते
‘स्वच्छता और गंदगी मे शुरू हुई है जंग ,आप किसके है संग ‘
हे घोषवाक्य बरेच कांही सांगून जाते .
तसं व्याकुळ झालेला सर पिराजीराव तलाव बरेच कांही सांगून जातो.

शब्दांकन : व्ही.आर. भोसले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks