ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंडलिक महाविद्यालयात ‘जागतिक अवयव दान’ दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या ‘एनसीसी विभागातर्फे’ शनिवार दि.१२ ऑगस्ट रोजी हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी ‘अवयव दान’ या विषयावर आधारित तयार केलेल्या विविध भितीपत्रकांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे स्वागत केले. आपल्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी जागतिक अवयव दान दिनाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून करण्यात झाले.

उद्घाटनानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत कुचेकर यांनी स्वतःवर झालेल्या हृदय प्रत्यारोपण या शस्त्रक्रिये पूर्वी त्यांना चालताना, बोलताना, श्वसन करताना, झोपताना तशाप्रकारे त्रास झाला हे सविस्तर सांगितले. सहा महिने अवयव दात्याची वाट पाहिल्यानंतर गोंदिया येथून त्यांना हृदय मिळाले. मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांची हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी त्यांना शुद्ध आली व त्यानंतर त्यांना बराच काळ अतिदक्षता विभागात राहावे लागले.

घरची परिस्थिती बेताची असताना कशाप्रकारे पैशांची जमवाजमव करावी लागली, कुटुंब आणि मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष आणि प्रसारमाध्यमांद्वारे कशाप्रकारे मदत गोळा केली हा सर्व अनुभव त्यांनी आपल्या वक्तव्यातून कथित केला. त्यांचा हा थरारक अनुभव ऐकून श्रोत्यांचे डोळे पाणावले. या शस्त्रक्रियेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी 14 महिन्यांनी आपले आयुष्य नियमित सुरू केले. सध्या ते १० कि.मी. सायकल चालवू शकतात, २००० दोरी उड्या मारतात, अनुक्रमे २१ कि.मी. १५ कि.मी. व दहा कि.मी. मॅरेथॉन प्रकारात त्यांनी अनेक मेडल्स मिळवलेली आहेत.

स्वतःवर बेतलेली परिस्थिती कोणत्याही व्यक्तीला अनुभवायला लागू नये यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर ‘विंग्स ऑफ हार्ट फाउंडेशन’ ची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते अवयव दानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना अवयव दानासाठी अर्जांचे वितरण करण्यात आले. हे अर्ज व त्याबद्दलची माहिती, अवयवदानाचे महत्त्व उपस्थितांनी सर्वच संबंधितांपर्यंत पोहोचवावी असेही आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित त्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून सांगितले. मृत्यूनंतर आपला देह हा माती किंवा राख होऊ न देता त्याचे दान करून गरजू व्यक्तींचे प्राण वाचविण्यास मदत करावी. आपल्या अवयव दानातून पुनर्जन्म घ्यावा असे आवाहन केले.

उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांनी सर्व उपस्थितांना प्रा. कुचेकर यांच्या अनुभवावरून आपण अवयवदानासंदर्भात समाजात व कुटुंबामध्ये जागरूकता पसरवावी असे आवाहन केले. नॅक कॉर्डिनेटर प्रा. डॉ. सौ. माणिक पाटील यांनी फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ३००० रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत यावरून अवयव दान किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

हिंदी विभागाचे प्रा. डॉ. एच् . एम. सोहनी यांनीही आपल्या ओपन हार्ट सर्जरी बद्दल उपस्थितांना आपला अनुभव सांगून आश्चर्यचकित केले. अवयवदान ही काळाची गरज बनली आहे व प्रत्येक नागरिकांनी जागरूकपणे अवयव दान करून गरजूंचे प्राण वाचवावेत असे आवाहन केले. प्रा. डॉ. सोहनी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमासाठी सर्व एनसीसी कॅडेट्स यांनी कठोर परिश्रम घेतले. कु. पद्मजा राऊत, कु. आरती गिरीबुवा, कु. तेजस्विनी कोठाळे, कु. प्राची, कु. वैष्णवी, कु. श्वेता यांनी अवयवदानाचे महत्व सांगणारी आकर्षक भित्तिपत्रके तयार करून आणली. प्रा. सौ. अर्चना कांबळे (इतिहास), प्रा. सौ. सोनाली कुंभार (अर्थशास्त्र), प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत (अर्थशास्त्र), बी.ए. व बी.कॉम. भाग १ चे सर्व विद्यार्थी व महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच कॅडेट पृथ्वीराज पाटील व सानिका शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks