ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढचे ५ दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय होणार ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

राज्यात पुढचे ५ दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार, पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर राहील, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

आज २४ जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंड आणि हिमाचलच्या बहुतांश भागात, हरियाणा, जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या काही भागात पुढे सरकला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उर्वरित भागात पुढील २ दिवसांत मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईसह, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे अतिवृष्टी झाली आहे. येथे आज शनिवारी ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगडमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

गोव्यातील बहुतांश भागांत गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला आहे. म्हापसा येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहर व उपनगरात आज (शनिवार) पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते. मात्र याचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवाही वेळापत्रकानुसार सुरू होती.

मुंबई व उपनगरात आज पडलेल्या पावसामुळे मान्सून दाखल झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होईल, असे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दादर, सायन, अंधेरी, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला आदी ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगली धावपळ उडाली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks