ताज्या बातम्याराजकीय

के. पीं. मुळे बिद्री गाव देशपातळीवर पोहचले : पालकमंत्री हसन मुश्रीफ ; बदनामी करणाऱ्यांना थारा न देण्याचे बिद्रीकरांना आवाहन

बिद्री ता. १( प्रतिनिधी/अक्षय घोडके) : बिद्री साखर कारखान्यात वेगवेगळे प्रकल्प उभारुन कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देत अध्यक्ष के. पी. पाटील यांनी बिद्री गाव देशपातळीवर पोहचवले. परंतु के. पी. पाटील यांच्या द्वेषापोटी त्यांच्या विरोधकांनी कारखान्यावर आरोप करुन बिद्रीची प्रतिमा मलिन केली. गावाची अशी बदनामी करणाऱ्या विरोधी आघाडीला या निवडणूकीत थारा देऊ नये. गावची बदनामी करणाऱ्या विरोधकांना चारीमुंड्या चीत करुन बिद्रीकरांनी त्यांना कायमचा धडा शिकवावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

                   बिद्री ( ता. कागल ) येथे श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग हरी पाटील होते.

                  यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले, चांगल्या लोकांच्या हातात संस्था असली की ती संस्था प्रगतीपथावर पोहोचते हे बिद्री साखर कारखान्याकडे पाहिले की लक्षात येते. के. पी. पाटील यांनी केलेल्या कामाची पोचपावती मागण्यासाठी आलो असून विरोधकांसारखे केवळ स्वप्ने दाखवण्यासाठी आपण आलेलो नाही. सुज्ञ सभासद या निवडणुकीत खऱ्या खोट्याचा योग्य तो फैसला करुन के. पी. पाटील यांच्याच हाती पुन्हा सत्ता सोपवतील यात तीळमात्र शंका नाही.

                 अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, राजकीय स्वार्थाने आंधळे झालेले विरोधक चांगल्या चाललेल्या संस्थेची बदनामी करत आहेत. परंतु ही बदनामी करताना त्यांनी कारखान्याचा पर्यायाने बिद्रीकरांचाही अपमान केला आहे. त्यामुळे बिद्रीकरच या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या विजयाचे शिल्पकार ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

                     यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकूळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, भैय्या माने, नविद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, प्रविण भोसले, डी. एम. चौगले, आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

                       यावेळी माजी सभापती जयदीप पोवार, सरपंच पांडुरंग चौगले, उपसरपंच आनंदा पाटील, शिवाजी पाटील, राजाराम चौगले, अण्णासो पोवार, उत्तम पाटील, संतोष ढवण, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग चिंदगे, राजेंद्र चौगले, प्रवीण पाटील, एम.आर. कांबळे, गोपाळ पोवार, नामदेव पाटील, तानाजी पाटील, केशव चौगले, मारुती चौगले, विलास पोवार, वसंत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, उस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले. आभार मयुरी कोदले यांनी मानले.

खिलारीमामांच्या रुपाने बिद्रीला प्रतिनिधीत्वाची संधी

या निवडणुकीसाठी बिद्री गावातून अनेकजण इच्छुक होते. परंतु पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रावसो खिलारी या सामान्य माणसाला उमेदवारीची संधी दिली. तर अन्य इच्छुकांनी ना. मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानून निवडणूकीतून माघार घेतली. रावसो खिलारी यांना प्रत्येक सभेत सभासदांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, ते के. पी. पाटील यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते घेऊन निवडून येतील आणि त्यांच्या रुपाने बिद्रीकरांना कारखान्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. यावर बिद्रीकरांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करुन खिलारीमामांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

बिद्री ; येथे महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेवेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ ; समोर उपस्थित जनसमुदाय.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks