ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी साहित्य वाचनातून प्रत्येक व्यक्तीने जगण्याचा आनंद घ्यावा- मा.प्राचार्य जीवनराव साळोखे.

गारगोटी प्रतिनिधी :

श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटीमध्ये भाषा मंडळ व गॅलेक्सी गणित विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी राजभाषा गौरव दिवस अगदी तेजोमित वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज हायस्कूल व ज्युनियर महाविद्यालय, मुरगूड चे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे हे लाभले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर हे होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाच्या भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.एन.मोरे यांनी करुन दिली.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेचे महत्व व विज्ञान दृष्ट्या विकसित असणाऱ्या विषयाचे संदर्भ पाट्या घेऊन ग्रंथदिंडी ने झाली. नंतर आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी……. अशा कुंडीतील रोपट्यांचा वटवृक्ष करण्यासाठी त्याला पाणी घालून प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते झाली.त्यानंतर कुसुमाग्रज व सी.वी.रमन यांचे प्रतिमपूजन व भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते झाले.

महाविद्यालयाचे द्वितीय वर्षाचे छात्र प्रशिक्षणार्थी दिग्विजय भोसले यांनी विज्ञान दिनावर आधारित पी.पी.टी. व अनिल वारके व अतुल चौगुले यांनी मराठी भाषेचे महत्व यावर आधारित मराठमोळ्या साहित्यिकांची माहिती पी.पी.टी द्वारे सादर केली.

प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये मा. प्राचार्य जीवनराव साळोखे यांनी मराठी भाषेची थोरवी सांगून, मराठी भाषा ही मुळात मराठी साहित्यावर तरलेली आहे. मराठी भाषेचा इतिहास हा काही आजकालचा नसून तो हजार वर्षांपूर्वीचा आहे. मराठी भाषेला ग्रंथसंपदेचे एक वेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या अमृतवाणीतून प्रकट झालेली आहे. पण आज या भाषेची अवस्था खूप बिकट झालेली आहे. आणि या भाषेला नवसंजीवनी देण्याचे काम फक्त ग्रंथसंपदा व मराठी साहित्य वाचक देऊ शकतात. त्यासाठी आपणाला सर्व ग्रंथसाहित्य चा अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर मराठी भाषा सुधारण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्नही शिक्षकाकडे असतात. त्यांनी मराठी भाषा सुधारण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना केल्या पाहिजेत. तरच समाजामध्ये मराठी भाषेची थोरवी अजरामर राहील असे मत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ .आर.डी.बेलेकर यांनी मराठी भाषा व विज्ञान जगतातून प्रत्येक व्यक्तीने आपले जगणे कसे सुखकर करावे याचे महत्त्व सुस्पष्ट केले. मराठी भाषा ही एक भाषा नसून ज्ञान घेण्याची ज्ञानसंपदा आहे. मराठी भाषेला साहित्याची मुहुर्तमेढ आहे. मराठी भाषा ही एक आपणा सर्व मराठी भाषिकांना मिळालेली देणगी आहे. संत साहित्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यातूनच खऱ्या अर्थाने ही मराठी भाषा ज्वलंत तरलेली आहे. मराठी भाषेमधून खऱ्या अर्थाने जगण्याची उमेद मिळते .मराठी भाषेचे महत्व जागृत करावयाचे असेल तर खऱ्या अर्थाने आपण मराठी साहित्याची जोपासना केली पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठी साहित्याची हाताळणी आपण केली पाहिजे. तरच मराठी भाषा टिकेल आणि मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्रधर्म टिकेल असे मत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी राज्य भाषा गौरव दिवस हा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वैज्ञानिक घटनेचे महत्व सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने विज्ञान दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर मातृभाषेचा सन्मान मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच मराठी भाषेचे महत्त्व ,तिची थोरवी अजरामर करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी मध्ये गॅलेक्सी गणित- विज्ञान मंडळ व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे दोन्ही दिन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले या कार्यक्रमासाठी शिवराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे, मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर.डी. बेलेकर, प्रा. डॉ. पी.बी. दराडे, प्रा.डॉ.एम.एन. मोरे, प्रा. डॉ. पी.एस.देसाई, प्रा. डॉ.आर.के.शेळके, प्रा. डॉ. पी. एस. रजपूत, प्रा. एस.आर. बाड व आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे छात्र प्रशिक्षणार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या छात्र प्रशिक्षणार्थी अंकिता नलवडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक साऊताई पाटील यांनी केले. कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका दिग्विजय भोसले यांनी केली. कार्यक्रमाची सांगता श्रद्धा देसाई यांनी आभार व्यक्त करून केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks