त्यांचा जोडीनेच संपला ‘इहलोकीचा प्रवास ‘ ! अवचितवाडीच्या विठ्ठलभक्त आसबे दाम्पत्याचा तेरा तासाच्या अंतराने मृत्यू

मुरगूड प्रतिनीधी : विजय मोरबाळे
पंढरीची वारी असो, बाजार असो, शेतातील मशागत असो अथवा बैंकेतील काम असो, नेहमी या दांपत्याचा जोडीनेच प्रवास असायचा. भजन, किर्तन, प्रवचन आणि वारी या सर्व प्रसंगात हे दोघे हमखास जोडीनेच दिसायचे. मात्र इहलोकीचा हा जोडीचा प्रवास वैकुंठवाशी होतानादेखील जोडीनेच होण्याचा योगायोग अवचितवाडी ता कागल येथील आसबे दाम्पत्याच्या बाबतीत घडला. केवळ 13 तासाच्या अंतराने मालुबाई आणि कृष्णा आसबे या वृध्द वारकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला.
77 वर्ष वयाच्या सौ. मालूबाई कृष्णा आसबे यांचे रात्री 10 वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामस्थ व नातलगांसह कुटूंबाने त्यांना रात्री अखेरचा निरोप दिला. सौ. मालूबाई यांच्या आकस्मित झालेल्या निधनाचा पती कृष्णा जीवबा आसबे यांना धक्का बसला. कांही वेळातच त्यांची तब्येत खालावत गेली. आणि 13 तासाच्या अंतराने दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वा. 87 वर्षे वयाचे कृष्णा आसबे यांनीही अखेरचा श्वास घेतला. हे दांपत्य गेली पन्नास वर्ष वारकरी संप्रदायात होते. हमिदवाडाच्या सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्यात अकाउंटंट विभागामधील कर्मचारी पांडुरंग आसबे यांचे ते आई-वडील होत. पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.