पन्हाळा : वाळवेकरवाडी येथे गवत कापल्याच्या कारणाने दोन गटात हाणामारी ; सहा जण जखमी

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
गवत कापल्याच्या कारणाने वाळवेकरवाडी (ता.पन्हाळा) येथे भाऊबंदकीत हाणामारी झाली.यामध्ये सहा जण जखमी झाले असून परस्पर विरोधी सात जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाळवेकरवाडी (ता.पन्हाळा) येथे गट नंबर २९६ व २९७ मध्ये पूर्वेकडे बापू धोंडी कुंभार यांची जमीन आहे .तर पश्चिमेकडे राजाराम श्रीपती कुंभार यांची जमीन आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी या दोघांच्या गट नंबर मधून पायवाट दिली आहे. पूर्वी या वाटेसाठी वादावादी झालेली होती ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हा वाद गावातच मिटवण्यात आला होता . बुधवार(ता.०८) रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास या जमिनीत बाबू धोंडी कुंभार हे गवत कापत होते .यावेळी राजाराम श्रीपती कुंभार यांनी याबाबत विचारणा केली असता वादावादी झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये दोन्ही बाजूचे सहा जण जखमी झाले.जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कळे येथे प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
याबाबत बाबू धोंडी कुंभार यांनी राजाराम श्रीपती कुंभार (वय ५५),निवास राजाराम कुंभार( वय ४५),भगवान राजाराम कुंभार (वय ४०)यांच्या विरोधात कळे पोलिसात मारहाणीची तक्रार नोंद केली आहे .तर राजाराम श्रीपती कुंभार यांनी राहुल जगन्नाथ कुंभार( वय २३),रघुनाथ बाबू कुंभार (वय५०) ,जगन्नाथ आबु कुंभार (वय ५०), बाबू धोंडी कुंभार (वय ७५) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे मिळून बाबू कुंभार, राहुल कुंभार, राजाराम कुंभार, निवास कुंभार, भगवान कुंभार हे जखमी झाले आहेत. यामध्ये काठी, कुराड,सळई ,दगड ,खुरपे यांचा सर्रास वापर झाला.कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.