कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीत दोन ठिकाणी घरफोड्या ; रोकडसह साडे तीन लाखाचे दागिने लंपास

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या करून रोख रकमेसह चार तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. या चोरट्यांनी जाताना चोरी केलेल्या घराच्या शेजारच्या भालकर यांच्या गोठयातील शेळीचा गळा चिरून मुंडक्यासह शेळी घेवून पसार झाले आहेत. गावात भीतीचे वातावरण आहे.
चिखली नानीबाई येथे सोमवारी पहाटे कुमार कांबळे व सुलोचना पोवार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. चिखलीतील चोरी झालेली ही घरे भर वस्तीत आहेत. सोमवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास भरवस्तीत राहणाऱ्या सुलोचना विष्णू पोवार व कुमार कृष्णा कांबळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
यात सुलोचना पोवार यांच्या घरातून रोख दहा हजार, सव्वा तोळ्याची सोन्याची चेन तांब्याची भांडी असा एक ते दीड लाखाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला तर कुमार कांबळे यांच्या घरातील रोख साडे बारा हजार, एक तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ व सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण असा दीड लाख किंमतीचा मुद्देमाला चोरून नेला. या चोरीच्या घटनेत सोन्याच्या दागिन्यांसह साडे तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला.