येता पाऊस मृगाचा…! सुटतो गंध मातीला…!; पहिल्याच पावसात पालटते निसर्गाचे रूपडे

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
मृर्गाचा पाऊस सुरू झाला की हा पाऊस सर्वाना हवाहवासा वाटतो.त्याच्या थेंबाणे व्याकुळलेली पृथ्वी तर तृप्त होतेच.थेंबाच्या शिडकाव्याने मातीला एक सुंदर असा परिमळ सुटतो. आणि निसर्गात अनेक बदल जाणवतात.याच
वातावरणात रानातील मोर आपला रंगीत पिसारा काढून मोदभरे नाचायला लागतात. हे मृगांच्या पावसाचे विशेष आहे.
पावसाळा सुरू झाला की,मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होते.या नक्षत्रात बियाण्यांची पेरणी केली जाते.आकाशात दिसणारी ढगांची दाटीवाटी पृथ्वीवर अंधार करून सोडते.उष्णतेच्या भडिमाराने तापलेली पृथ्वी शांत होते. पानाफुलात उत्साहिपणा आणि टवटवीत पणा जाणवतो. डोंगरात अन शेतात तृणाची पाती अलगद डोके वर काढून जमिनीच्या कुशीतून वर येतात. निसर्गाला आणि शेतीला हिरवीगार झालर पांघरली जाते.कधी तरी हळूच ढगातून ऊन डोकावून पहाते.
झाडांच्या पानांवर पडणारे पावसाचे थेंब मोत्यासारखे वाटतात,शेजारी आसपास आणि शेतात बेडकांचे डरावने सुरू होते.त्यांच्या कर्णकर्कश आवाजाने कान बधिर होतात.आकाशात इंद्रधनू चे सप्तरंग अधून मधून पहायला मिळतात.शेतात पाण्याची डमके लक्ष वेधून घेतात.तर डोंगरातील झाडे झुडुपे खुलून दिसतात.
एकंदरीत मृगांच्या पावसात मन न्हाऊन निघते.आणि या दिवसात जे बदल होतात ते मात्र वेगळेच असतात.सर्वांच्या मनाला लाभतो तो मात्र गार आणि शितल गारवा. आणि मनसोक्त मातीचा दरवळ
येता पाऊस मृगाचा
सुटतो गंध मातीला
या मातीचा गंधच न्यारा
आवडतो मज साऱ्यांना!!