भूमि अभिलेख विभागाला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन प्रदान; जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध करुन देणारा कोल्हापूर राज्यातील पहिला जिल्हा.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागातर्फे होणारे मोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ९८.४१ लाख रुपयांची अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते भूमि अभिलेख विभागाला प्रदान करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम, सुधाकर पाटील, शशिकांत पाटील.. आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापुरातील भूमि अभिलेख विभागाकरिता एकूण ११ रोव्हर आणि ६ वाईड फॉरमॅट प्रिंटिंग मशीन (प्लॉटर) खरेदी केली आहेत. यामुळे जिल्ह्यातील मोजणीचे काम अधिक गतिशील व अचूक होणार आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध करुन देणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.
ही प्रणाली जीएनएसएस व जीपीएस प्रणालीवर आधारित असल्याने मोजणी अधिक अचूक व कमी कालावधीमध्ये होणार आहे. यासाठी आवश्यक कंटीन्यूअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन(CORS) जिल्ह्यात हातकणंगले व आजरा येथे उभारणी करण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसा सारख्या उंच पिकांमध्ये सुद्धा मोजणी करणे शक्य होणार आहे. डोंगराळ भागामध्ये इतर मोजणी साधन सामुग्रीच्या आधारे मोजणी करण्यावर मर्यादा येतात. परंतु या नवीन प्रणालीने हे काम सहजरित्या करता येऊ शकते.