वटपौर्णिमेतून वृक्षारोपण संदेश

कोल्हापूर :
आज वटपौर्णिमा. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला प्रदक्षिणा घालून हे व्रत केले जाते. त्याकरिता मिळेल त्या ठिकाणी वटवृक्ष शोधत महिलावर्ग झुंडीने फिरतांना दिसतात.
मुरगुड येथील ज्ञानेश्वर कॉलनी येथील महिलांनी मात्र एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या वेगळ्या वाटपूजेचे कौतुक होत आहे.
या महिलांनी मोठा वटवृक्ष न शोधता बागेतील एका कुंडीतील वटवृक्षाभोवती फेर धरले.
या छोट्या रोपट्याची पूजा करून वडाचे झाड लावा असा वृक्षारोपणाचा संदेश तर दिलाच शिवाय निसर्गातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढायची असेल तर वटवृक्ष सर्वात जास्त महत्वाचा आहे हे ही पटवून देण्याचा प्रयत्न केला.
वटवृक्ष इतर झाडांच्या कितीतरी अधिक प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतो हे वनस्पती शास्त्राने सांगितले आहे .इतरही या श्रेणीतील वृक्ष प्रत्येकाच्या बागेत ,परिसरात ,शेतात लावले पाहिजेत असे संदेश प्रसारमाध्यमातून दिले जातात.
या महिलांनी त्याचे तंतोतंत पालन तर केलेच शिवाय कोरोनाकाळातील लॉक डाउन चे नियम पाळले गेले.
घराजवळील बागेतच वडाच्या रोपांची पूजा करून त्यांनी दिलेल्या या वेगळ्या संदेशाचे कौतुक होत आहे.