..अन्यथा महापालिकेवर बादली मोर्चा; रामानंदनगर ओढ्याचे पाणी घरांमध्ये; ‘आप’ने केला रास्ता रोको

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
रामानंदनगर मधील जाधव पार्क येथील नाल्यात असलेल्या बंधाऱ्यामुळे दरवर्षी येथील आजूबाजूच्या 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. तसेच नाल्यात असलेल्या गुंजन पॅराडाईझ या अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामामुळे पाणी योग्य पद्धतीने निचरा होत नाही. रात्री-अपरात्री पाणी घरात आल्याने या परिसरातील नागरिकांना दरवर्षी याचा त्रास सहन करावा लागतो.
जाधव पार्क मागील नाल्यातील बंधाऱ्याचा उपयोग पिण्याचे पाणी अडवण्यासाठी केला जात होता. परंतु आता त्याचा उपयोग केला जात नाही. बंधारा हटवून नाल्यातील पाण्याला वाट मोकळी करून दिल्यास पुराचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही. त्यामुळे हा बंधारा हटवून पाण्यास वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती.
या नाल्यामध्ये गुंजन पॅराडाईझ या अपार्टमेंटने अनधिकृत बांधकाम करून रिटेनिंग वॉल बांधली आहे. यासंबधी आयुक्तांचे आदेश असून देखील ती भिंत हटवली गेलेली नाही. संबंधित भिंत त्वरित हटवून नाल्यातील अतिक्रमण काढावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. वर्षभरापूर्वी आयुक्तांनी अतिक्रमणस्थळी भेट देऊन भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. परंतु यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे आज परिसरातील नागरिकांना घेऊन ‘आप’ने रामानंदनगर येथील पुलावर रास्ता रोको केला.
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या रास्ता रोकोची दखल घेत महापालिकेचे अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले. संबंधित अतिक्रमणावर कारवाई करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. येत्या 15 दिवसात प्रश्न सोडवला नाही तर ओढ्यातील पाणी घेऊन महापालिकेवर बादली मोर्चा काढू असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, राज कोरगावकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, अश्विनी गुरव, उज्वला भोसले, प्रेम बनगे, तुषार पाटील, वेंकटेश दासार, सतीश भाले, आदम शेख, रविराज पाटील, गिरीश पाटील, विशाल वठारे, राकेश गायकवाड, विजय भोसले, विजय हेगडे, महेश घोलपे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.