कागल : राजे फाउंडेशनच्या विस्तारित कोविड केअर सेंटरचे उदघाटन ; दहा ऑक्सिजन बेडसह पन्नास बेडची सुविधा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजे फाउंडेशनच्या विस्तारित कोविड केअर सेंटरचे उदघाटन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते केले.
राजे फाउंडेशन मार्फत शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर पंचवीस बेडचे कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. हे सर्व बेड फुल्ल झाले आहेत. वाढत्या रूग्ण संख्येमुळे नातेवाईकांकडून बेडसाठी वारंवार विचारणा होत आहे.त्यामुळे बेड अभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राजे फाउंडेशन मार्फत आणखी पंचवीस बेड वाढविण्यात आले आहेत.आता या विस्तारित केअर सेंटर मध्ये दहा ऑक्सिजन बेडसह पन्नास बेड उपलब्ध झाले आहेत. एक ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपलब्ध आहे. याशिवाय रुग्णांना सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली आहे.आता पर्यंत पंधरा रूग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कागल करवीर तालुक्यासह सीमाभागातील रूग्णांची होणार आहे.
यावेळी कोविड केअर सेंटरचे डॉ प्रवीण चव्हाण, डॉ तुषार भोसले, डॉ महेंद्र पाटील, सैफ शेख, साहिल अन्सारी,शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील,यशवंत माने, सचिन मगदूम आदी उपस्थित होते
..आणि वैद्यकीय कर्मचारी झाले भावूक
यावेळी सौ नवोदिता घाटगे यांनी या सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. आपण जीव धोक्यात घालून करत असलेली रुग्ण सेवा कौतुकास्पद आहे.या ठिकाणी सेवा देत असताना आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुटुंबियांचीही काळजी घ्यावी असे भावनिक आवाहन केले.त्यामुळे हे कर्मचारी भावूक झाले.