12 हजाराच्या लाच प्रकरणी महावितरणची महिला सहाय्यक अभियंता अॅन्टी करप्शनच्या रडारवर, गुन्हा दाखल
पुण्याच्या धानोरी येथील (Dhanori) महावितरण कार्यालयातील महिला सहाय्यक अभियंत्या 12 हजार रूपयाच्या लाच मागणी प्रकरणी अॅन्टी करप्शनकडून विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अभियंत्याने 20 हजार रूपयाची सुरूवातीला मागणी करून तडजोडीअंती 12 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
हर्षाली ओम ढवळे (38, पद – सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, धानोरी शाखा, पुणे) असे लाचेची मागणी करणार्या महिला सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे लायझनींगच्या कामासाठी विद्युत ठेकेदाराकडे नोकरीस आहेत. ग्राहकाचे वीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करून महावितरण धानोरी शाखा कार्यालयात ते गेले होते. त्या कार्यालयातील सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे यांनी यापुर्वी केलेल्या 3 थ्री फेज कामाचे व सध्याचे 1 फेजचे वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी सुरूवातीला 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे यांनी यापुर्वी केलेल्या 3 थ्री फेज विद्युत मीटर कामाचे व सध्याचे 1 थ्री फेजचे प्रलंबित वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी तडजोडीअंती प्रत्येकी 3 हजार रूपये याप्रमाणे 12 हजार रूपयाची लाच मागितली हे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी सांगितले आहे