ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉकडाउनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की…

टीम ऑनलाईन

राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने एकीकडे राज्य सरकारकडून लॉकडाउनचा इशारा दिला जात असताना महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने याला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याला आणि जनतेला लॉकडाउन परवडणारा नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. निश्चितच लॉकडाउन हे राज्याला, जनतेला कोणालाच परवडणारं नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाउन हा पर्याय नसल्याचा आग्रह धरला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्यास सांगितलं आहे. पण याचा अर्थ लॉकडाउन अपरिहार्य आहे असं नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाउन टाळता येऊ शकतो”.

टाळेबंदीऐवजी कठोर निर्बंध!
राज्यातील करोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे. मात्र, संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहील. परंतु, रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याच्या पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अनिर्बंध वावरावर अंकुश आणण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे नियोजन सुरू आहे. ‘‘अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत घट झाली नाही तर आम्ही पुढच्या पातळीवरील कठोर निर्बंध लागू करण्याचे पाऊल उचलू’’, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. स्थलांतरीत कामगारांमध्ये घबराट निर्माण होऊन ते पुन्हा आपल्या मूळ गावी जातील, अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची नाही. गेल्यावर्षीसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. परंतु जे लोक नियम धुडकावतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर नियम आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी करोनाची दुसरी लाट रोखण्याकरिता कठोर उपायांवर भर दिला. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले. करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीही बैठक होणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks