विशेष लेख – काय ती भाषणं, काय ती आश्वासनं, काय ते अधिवेशन ! एकदम ओके

शब्दांकन : व्ही.आर.भोसले
महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकारचा विश्वास दर्धक ठराव ,त्यातील भाषणं ,आणि जनतेला दिलेली आश्वासनं.त्यामुळे हे अधिवेशन गाजलं .
एकदम झकास .याला कारण म्हणजे चाळीसभर आमदारांच्या उठावातून(बंड नव्हे) निर्माण झालेलं हे नवं सरकार आतापर्यंत धक्क्यावर धक्के देत सत्तेवर आलं .
शिंदे फडणवीसांच्या या सरकारवर पत्रकारांनी किती विश्लेषणं केली ; किती टीका टिपणी कराव्यात याला मोजदाद नव्हती .
भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे क ३९ म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशी चर्चा सुरू झाली .सायंकाळी ७:३० ला फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशा बातम्या झळकल्या.एकनाथ शिंदे गोव्यात.
साडेसहाला मोबाईल ,टीव्ही एकाएकी ओरडू लागले .एकनाथ शिंदे मुख्यमंत्री.
फडणवीस बाहेर रहाणार .
पावणेसातला आणखी एक धक्का .
फडणवीस उपमुख्यमंत्री .
राज्यभर सगळयांनी डोकी खांजळायला सुरूवात केली.
चाणक्य निती काय ! ,बुद्धिबळ काय,! सोशल मिडियावर कॉमेंट्स काय !
कायच ओके वाटेना .
एकदा साडे सात वाजले .
खरंच की .एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची व देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सुद्धा .एक धक्का और !
तेथून सुरू झाली पुन्हा विश्लेषणे ,लेख ,तर्क आणि कुतर्क ही .
सोशल मिडियावरून लंबे लंबे लेख आले ,व्यंग चित्रं आली. पट्टीचे कवि आणि शायर पार मागे पडतील अशा
कमेंट्स .
मस्त करमणूक होती दोन तीन दिवस .
आणि ते ४ तारखेचे विश्वास दर्शक अधिवेशन पार पडले .
Floor test ,Floor test असं सारखं म्हणत होते ना ते हेच .
Floor test झाली .शिंदे फडणवीस सरकारने १६४:९९ फरकाने कुस्ती जिंकली .
आणि सुरू झाली नेत्यांची भाषण .
काय ती भाषणं आणि काय ती आश्वासनं .टीव्ही समोरून कोण हलायचं नाव काढेना .
प्रथम देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणार भाषण केलं.
आपल्या जिवलग मित्राबद्दल बोलावे तसे ते बोलत होते .आड पडदा कोठेच नव्हता .देहबोली सुद्धा (body language ) निर्मळ होती .
आपल्या भाषणात त्यानी शिंदेंची अशी स्तुती केली की जणू एकनाथांच्या अभंगातून पांडुरंगाचे दर्शन व्हावे .कान आणि मन तृप्त व्हावे .
त्यानी सरकारच्या भावी योजनांचीही नांदी केली .
रखडलेली आरे येथील कार शेड योजना .समृद्धी मार्ग ,जनसामान्यांच्या साठी २४×७ तास एकनाथजींबरोबर काम करण्याची घोषणा , पक्षशिस्त व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन ,मी पुन्हां येईन म्हंटले होते ,;त्याची झालेली टिंगल टवाळी अस सगळं मोकळं बोलून ते म्हणाले
” मी पुन्हां आलोय ,पण एकनाथजींना बरोबर घेऊन आलोय .”
शेवटी ते असंही म्हणाले .
” मला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मला सूड उगवायचा आहे .म्हणजे त्यांना माफ करायचं आहे .”
टाळ्यांचा कडकडाट .
किती सुंदर भाषण !
अजित पवार उठले .अभिनंदन करण्यापूर्वी त्यांनी म्हंटले.
“देवेंद्रजींच्या भाषणात तो उत्साह ,तो आवेश नव्हता,ती देहबोली दिसली नाही .”
ऐकणाऱ्यांचे कांन टवकारले होते .
दादांना जणू म्हणायचं होत की “देवेंद्रजी तुम्हीं नाखुषीने पद स्वीकारलय .वरून आलेल्या दडपणाने.”
बाळासाहेब थोरात सुद्धा त्यांच्या बद्दल असंच कांहीतरी म्हणाले.
“देवेंद्रजीनी चांगलं काम केल्यामुळेच त्यांना बहुतेक मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्रीपद मिळालंय .”
श्रोत्यांचे कांन पुन्हा ताठ .एकदा करंगळीने त्यांनी ते साफ केले .चार बोटांनी मान खाजवली .
भास्कर जाधव ,सुधीर मुनगंटीवार ,गुलाबराव पाटील,विनय कोरे यांचीही भाषणं झाली .
कोडं सुटेनास झालं .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण झालं .टीव्हीवर लोकांना ते पाहिल्यांदाच ऐकायला मिळाले .
रांगडा दोस्त पारावर बसून बोलतोय असं ते खुमासदार भाषण होतं .
हृदयाला भिडणारे .त्यांच्या भाषणाने श्रोत्यांच्या शंकाही दूर झाल्या .
“नरेंद्रजी मोदी म्हणाले ,एकनाथजी अप अच्छा काम करो ,राज्य को आगे बढावो ,अमित शहा साहेब म्हणाले ,एकनाथजी हम तुम्हारे पिछे चट्टान बनकर खडे रहेंगे .,चड्डा साहेब यांनीही प्रोत्साहन दिले .”
एकनाथ शिंदेच्या या शब्दांतून सर्व शंका दूर झाल्या .
कांहीनी म्हटलं होतं की ही सगळी भाजप नेत्यांची चाणक्य निती आहे .मुंबईला मिळवण्यासाठी ही त्यांची धडपड आहे .ती देशाची अर्थिक राजधानी आहे .मुरारजी देसाईंनी १०५ बळी घेतले .त्यांच्या नांवाने हुतात्मा चौक झाला .आचार्य अत्रे ,बाळासाहेब ठाकरे .नानासाहेब गोरे .जोशी,यशवंतराव चव्हाण अशा अनेकांच्या प्रयत्नाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गाजली होती .
बेळगाव ,कारवार ,धारवाड सह महाराष्ट्र झाला पाहिजे अशी चळवळ पुढे बरेच दिवस सुरू होती .तो मामला सर्वोच्च न्यायालयात असल्याचे बोलले जाते .
म्हणजे मुंबई बद्धल जो प्रचार केला जातोय तो एक गैरसमज आहे असंही या भाषणातून निष्पन्न झाले .
सगळं ऐकून जमिनीवर हात टेकून श्रोते उठू लागले तेव्हा त्यांना सांगोल्याच्या आमदार शहाजी पाटील यांच्या त्या गाजलेल्या गद्यकाव्याची आठवण झाली असेल.
‘काय ती भाषणं, काय ती अश्वासनं आणि काय ते अधिवेशन ,एकदम ओके ‘
शब्दांकन : व्ही.आर.भोसले