मुरगुडचा पहिल्या सार्वजनिक नळाची शताब्दी ; छ.शाहू महाराजाच्या दूरदृष्टीचे जलवैभव ; सर पिराजीराव तलावाच्या बांधकामाला १०४ वर्षे.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर संस्थानाच्या मुरगूड जहागिरीत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या सर पिराजी तलावाच्या बांधकामाला एकशे चार वर्ष पूर्ण होत आहेत. तर तलावाच्या जलवैभवातून मुरगूड शहरासाठी छ.शाहू महाराजांनी बांधलेल्या पहिल्या सार्वजनिक नळाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
तीन चौरस मैलाचा परीघ, ४२५० फूट लांबी, ७५० फूट लांबीची मुख्य दगडी भिंत, १० कोटी २२ लाख २९९८० घनफूट जलसंचय क्षमता ,पूर्व बाजूला १०० फूट तर पश्चिम बाजूला २४०० फूट लांबीचा भरावा आणि १२० एकरात पसरलेले जलवैभव, सायफन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, दणकट बांधकाम,स्थापत्य कलेचा उत्तम नमूना , प्रमाणबद्ध आखणी आणि बांधकामापासून आजतागायत थेंबबर पाण्याची गळती नसलेला….मुरगूडचा सर पिराजीराव तलाव छत्रपती शाहू महाराजांचा गौरवशाली कार्यकर्तृत्वाचे चिरंतन व शाश्वत वैभव आहे.
२१ व्या शतकात स्थापत्य क्षेत्रात नव तंत्रज्ञानाने अचंबा वाटणारी धरणे बांधली गेली. त्याची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरणाच्या रूपाने करवीर संस्थानातून केली. मुरगूड हे कागल संस्थानातील तळकोकणाशी जोडलेले व्यापारी केंद्र. त्यामूळे या गावाकडे राजर्षी शाहू महाराजांचे विशेष लक्ष. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९१९ ला महाराजांचे वडील कागलचे अधिपती कै. श्रीमंत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांनी मुरगूडला तलाव बांधण्याचा निश्चय केला. पण दुर्देवाने त्यांच्या हयातीत तो पूर्ण झाला नाही.
छ. शाहू महाराजांचे बंधू पिराजीराव घाटगे यांनी ३ जानेवारी १९१९ ला तलावाच्या बांधकामास सुरुवात केली. वेठबिगारीतून सुमारे आठ लाख रुपये खर्चातून संस्थानाचे सल्लागार दिवाणबहादुर बी.जी. जगताप, इंजिनीयर आ .कृ .सरनाईक यांच्या देखरेखीखाली १९२३ ला तलावाचे बांधकाम पुर्ण झाले.तलावाच्या पूर्वेला असणाऱ्या खाणीतील दगड तर ६ ते ७ मैल परिघातील चुन्याच्या भट्टीतील चूना बांधकामासाठी वापरला आहे. १९२३ सालापासून मुरगूडसह शिंदेवाडी व यमगे गावांना या तलावातून अव्याहत पिण्याचे पाणी सायफन पद्धतीने पुरवले जाते.
मुरगूड शहराला सायफन पद्धतीने पाणी देण्यासाठी शहराच्या वेशीवर व आता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या हुतात्मा तुकाराम चौकात पहिला सार्वजनिक नळ बसविण्यात आला. २४ जानेवारी १९२२ रोजी या सार्वजनिक नळाचे उद्घाटन शाहू महाराजाच्या हस्ते झाले. या सोहळ्यास
श्रीमंत महाराणी आईसाहेब महाराज,श्रीमंत महाराणी साहेब देवास,श्रीमंत मधूयराज राजाराम महाराज,श्रीमंत युवराज्ञी ताराबाई राणीसाहेब महाराज,श्रीमंत इंदुमती राणीसाहेब महाराज, नगरपाल गोपाळराव सुर्यवंशी – पाटील, दिवाण सी.आय.सबनीस उपस्थित होते.

वारसास्थळ विकसित व्हावे ….
मुरगूडला राजर्षी शाहू महाराज सहा ते सातवेळा आल्याचे आढळून येते.इथल्या जनतेला पाणी मिळावे या दूरदृष्टीतून त्यांनी तलावाची निर्मिती केली.तलावातून सायपनने पाणी आणून उभा केलेला हा पहिला सार्वजनिक नळ म्हणजे ऐतिहासिक ठेवा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यदिनाच्या निमित्ताने हे ठिकाण वारसास्थळ म्हणून विकसित व्हावे.