मराठी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोना संसर्गामुळे निधन

मुंबई :
प्रख्यात मराठी अभिनेता भूषण कडू याच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली. कादंबरी कडू 39 वर्षांच्या होत्या. भूषणला प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले होते. उपचारादरम्यान कादंबरी कडू यांनी अखेरचा श्वास घेतला.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रिअॅलिटीच्या पहिल्या सिजनमध्येही भूषणने हजेरी लावली होती. फॅमिली स्पेशल एपिसोडच्या निमित्ताने भूषणची पत्नी कादंबरी आणि मुलाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती
दरम्यान, भूषण कडूने अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. एक डाव भटाचा, श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल हाऊस फुल, मस्त चाललंय आमचं, टारगेट, दगडाबाईची चाळ यासारख्या कलाकृतींमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.