महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, राज्याच्या एसटी बसवर दगडफेक

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर बस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगडफेक केल्याने कोल्हापुरात तणावाचे वातावरण पसरले आहे. ही दगडफेक होताच स्थानकात उपस्थित लोकांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काल शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड रक्षक वेदिके संघटनेने हल्ला केला.
या हल्ल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. या वादाचा परिणाम एसटी महामंडळाच्या बससेवेवर झाला आहे.या घटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक कोल्हापुरात शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले.यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले होते.त्यानंतर आज सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्राच्या बसवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या घटनेमुळेमहाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.