लसीकरणानेच जीवन पूर्ववत होईल; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास; कागलमध्ये १८ ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणाचा प्रारंभ.

कागल :
लसीकरण पूर्ण झाल्यावरच मानवी जीवन पूर्ववत होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. येत्या काळात किमान ७० टक्के लसीकरण पूर्ण व्हावेच लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कागल ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेच्या या कार्यक्रमात श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्ह्याच्या कोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या डोसच्या या मोहिमेचा प्रारंभ कागलमधून झाला.
प्रास्ताविकपर भाषणात कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सुनीता पाटील म्हणाल्या, ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून दररोज २०० जनांना लसीकरण केले जाणार आहे. सध्या कोव्हॅक्सीन या लसीचा पुरवठा झालेला आहे.
यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, डॉ प्रथमेश गडदे, डॉ. तृप्ती भोसले, डॉ. प्रियांका किल्लेदार, कल्पना रत्नाकर, सायली डाफळे, अनुप्रिया भोई, ओंकार कागले, जयंत खोत आदी उपस्थित होते.