कोल्हापूर : पोलिसाची कौटुंबिक वादातून आत्महत्या

गडहिंग्लज प्रतिनिधी :
पोलिसाने कौटुंबिक वाद आणि नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथे घडली. रामदास अशोक घस्ती (वय ३४) असे पोलिसाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सोशल मीडियावर ‘मी चाललोय’ असा स्टेट्स टाकून जीवनयात्रा संपविल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची वर्दी कांचनकुमार बाबूराव घस्ती यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली.
याबाबतची माहिती अशी, रामदास घस्ती हे कोल्हापूर पोलिस दलात असून चंदगड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. दहा वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. आई – वडिलांसोबत राहत होते. त्यांचा पत्नीशी वाद होता. बर्याच दिवसांपासून ती मुलासह माहेरीच राहत होती. गेल्या दोन – तीन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरुच होता. शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बाहेरील सोप्यामध्ये असलेल्या लाकडी खांबाच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरी लावून गळफास घेतला. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
स्टेटस टाकून जीवनयात्रा संपविली….
घस्ती यांनी गळफास घेण्यापूर्वी सोशल मीडियावर ‘मी चाललोय’ असा स्टेटस् टाकला होता. यावर त्यांच्या अनेक मित्र, सहकार्यांनी ‘कोठे चाललास’ अशी विचारणा केली होती. मात्र यानंतर काहीच क्षणात त्यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्या स्टेटसचा अर्थ समोर आला. याचीही सर्वत्र चर्चा सुरु होती.