कोल्हापूर: हॉटेलचे बिल न देणे पडले महागात; जेवणाच्या बिलावरून पोलिसाचाच धिंगाणा, भुदरगडचा सहाय्यक फौजदार निलंबित

गारगोटी:
हॉटेलचे बिल न देण्याच्या कारणावरून दारू पिऊन हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. हे प्रकरण भुदरगड पोलीस ठाण्याच्या एका सहायक फौजदाराच्या अंगलट आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी सहाय्यक फौजदारास तत्काळ निलंबित केले आहे. तानाजी रामचंद्र विचारे असे निलंबित फौजदाराचे नाव आहे.
गारगोटी पिंपळगाव रोडवरील धामणे फाट्यानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये सहायक फौजदार तानाजी विचारे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर बिल देण्यास नकार देऊन हॉटेल मालकास मारहाण केली. तसेच मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत जोरदार धिंगाणा घातला.
हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी सर्व्हिस चांगली दिली नसल्याने त्याचा इगो दुखावला गेला. या रागातून त्याने पैसे देण्यास नकार दिला. चालकाने यांबाबत विचारताच चक्क त्यालाच मारहाण सुरू केली. त्याची ही दादागिरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात टिपली जात असल्याचे भान त्याला नव्हते.
पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या या मग्रूर पोलिसावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सर्व सीसीटिव्ही फुटेज मागवून घेतले. पंचनामा करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत गुरुवारी संध्याकाळी हालचाली सुरू झाल्या आहेत.
“सदरक्षणाय खलनिग्रहणाय” असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस खात्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीने संपूर्ण खातेच बदनाम होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याची सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नाहक बदनामीची नामुष्की पत्करावी लागत आहे.
याबाबतची फिर्याद हॉटेल मालकाने भुदरगड पोलिसांत दाखल केली होती. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिला. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी विचारे यास तातडीने निलंबित केले आहे.