निवडणूका आहेत तिकडे कोरोना नाही का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी थेट संवाद साधला असून जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं. त्याबरोबरच त्यांनी विरोधकांवर ही सडकून टीका केली आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात चर्चा करून महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
फेसबुक लाईव्ह दरम्यान जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. देशातील ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यात कोरोना नाही का? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले की, ‘इतर राज्यात काय आहे, याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही, माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे’, असं त्यांनी बोलून दाखवलं.
सध्या पश्चिम बंगाल आणि आसामसह काही महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिथे मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचे मेळावे आणि सभा होत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या सोहळ्यांना होत असल्याने तिकडे कोरोना नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त न करणं पसंत करून आपलं राज्य आपल्याला महत्त्वाचा असल्याचं बोलून दाखवलं.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात तज्ञांशी चर्चा करून काय मार्ग काढता येईल याचा विचार करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.