भारताने चौथा सामना जिंकत साधली बरोबरी; इंग्लंडचा ८ धावांनी पराभव

अहमदाबाद :
मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी अत्यंत रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडवर ८ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना शनिवारी रंगेल. सूर्यकुमार यादवचे तडाखेबंद अर्धशतक मोलाचे ठरले.
१८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला.
अखेरच्या षटकात २२ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरच्या सुमार माऱ्याचा इंग्लंडने फायदा घेतला. जोफ्रा आर्चरने एक चौकार व एक षटकार ठोकाल, शिवाय शार्दुलने दोन वाईड चेंडू टाकत भारताला दडपणात आणले. मात्र, पाचव्या चेंडूवर आर्चरला बाद करुन शार्दुलने मोलाची कामगिरी केली आणि भारताचा विजय निश्चित झाला. पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करत भारताने ८ बाद १८५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंडने झुंजार खेळ केला, मात्र मोक्याच्यावेळी प्रमुख फलंदाज बाद झाल्याने दडपणाखाली त्यांचा डाव २० षटकांत ८ बाद १७७ धावा असा घसरला. शार्दुलने १७व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर बेन स्टोक्स व इयॉन मॉर्गन यांना बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर नेले. शार्दुलने ३, तर हार्दिक व राहुल चहरने २ बळी घेत चांगला मारा केला.