शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजू शेट्टींचे हुंकार यात्रेचे आयोजन

बारामती :
महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या राजू शेट्टी यांनी भाजपच्या काळातही कृषी कायदे मागे घेताना आठशेहून अधिक शेतक-यांचा बळी गेला, खतांच्या किंमती वाढल्या, बळीराजा अडचणीत आहे, अशा स्थितीत भाजपसोबत कसे जाणार, असा सवाल करत आपली भूमिका आज बारामतीत स्पष्ट केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हुंकार यात्रेच्या निमित्ताने बारामतीत पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेचा इन्कार केला.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी सर्वच स्तरावर अडचणीत आहे, उसाचे वेळेत गाळप नाही, वीजटंचाईचे संकट, उसाच्या शेतीचा खर्च जवळपास 214 रुपये प्रतिटन वाढला आहे, खत व इतर बाबींत वाढ, इंधन दर वाढीचे संकट या मुळे उस दर परवडेनासा झाला आहे.
एकीकडे सामान्यांचे प्रश्न बिकट होत असताना महागाई वाढते आहे, रोजगार कमी होतो आहे, या कडे लक्ष देण्याची गरज असताना प्रत्यक्षात ईडी, इनकमटॅक्स, भोंगा प्रकरण यात सत्ताधारी मश्गुल आहेत. केंद्र व राज्यातील विरोधक गप्प आहेत, त्या मुळे हुंकार यात्रेच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्यासाठी यात्रा आयोजित केल्याचे ते म्हणाले.
राज्यातील वीजेच्या संकटाबाबत ते म्हणाले, कोळसा टंचाई हे कारणच तकलादू आहे. पण खरच केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली पाहिजे.
..म्हणून बाहेर पडलोय
11 फेब्रूवारीला शरद पवार यांना पत्र लिहिले होते. त्यात सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिले. शेतकऱ्यांसंबंधी अन्यायकारक निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला व्हायचा निर्णय घेतला.