शरद पवारांच्या प्रकृतीवर टीका, भाजपने दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर …. मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एकीकडे पवार यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. मात्र दुसरीकडे पवार यांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांनी जोडला आहे . यावरून भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दिला.
भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या कुठून कुठून कळा येतील बघा” असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.
दरम्यान भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.