ताज्या बातम्या

कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकाधिक पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक लसींचे डोस मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देवून कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण आढावा बैठक आज श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच हाफकिन संस्थेच्या कार्यकारी संचालकांशी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीदरम्यान दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कोल्हापूर जिल्ह्याला अधिकाधिक लसींचे डोस उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना केल्या. तसेच इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय व गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,असे सांगितले. जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या, उपचार पद्धती, उपलब्ध औषधसाठा, प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आदी बाबींचा आढावा घेऊन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात ‘कोरोना मुक्त गाव’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येवू शकेल. कोरोनाची तिसरी लाट व डेल्टा प्लस व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणेने आटोकाट प्रयत्न करावेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला दररोज 50 हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शहरात तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks