ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोविड 19 च्या संभाव्य तिस-या लाटेची शक्यता नजिकच्या कालावधीत वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक, दलित, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वाडी-वस्तीवरील, दुर्गम भागामध्ये राहणारे लोक, अशिक्षित नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. यामुळे या समाजातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक समाजामध्ये लसीकरणाविषयी काही गैरसमज असण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व धर्माच्या धार्मिक गुरुंसाठी त्यांचे लसीकरणाविषयीचे गैरसमज, शंका, अडचणींचे निराकरण करणे तसेच लसीकरणाची जनजागृती करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व धर्माच्या धार्मिक गुरुंसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभेचा उद्देश कथन करुन जिल्ह्यातील सद्य स्थितीची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी उपस्थित सर्व लोकांनी त्यांच्या लसीकरणाविषयीच्या शंका अडचणी याबाबत सकारात्मक चर्चा केली. उपस्थितांनी लसीकरणाबाबत लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज असून लोक लसीकरणासाठी घाबरत आहेत. सर्व मशिदीच्या ट्रस्टींना आपण वैयक्तिक पत्र देवून आवाहन करावे, मशिदीशेजारील सभागृह अथवा शासकीय इमारत, शाळा या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करण्यास विनंती केली आहे. त्याठिकाणी स्थानिक समाजामार्फत लाभार्थ्यांना मोबिलाईज करणे व सत्राच्या ठिकाणी मनुष्यबळ पुरविणे व इतर साहित्याची उपलब्धता करुन देणे याची जबाबदारी स्वीकारत असल्याद्दल आश्वासित केले.

लसीकरणाविषयी उपस्थितांच्या शंका, अडचणी जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी, श्री. रेखावार म्हणाले, उपस्थित सर्व धर्मगुरुंनी आपआपल्या समाजातील लोकांचे लसीकरणाविषयी गैरसमज दूर करुन लसीकरण करुन घेण्याविषयी जास्तीत-जास्त जनजागृती करावी. यासाठी सोशल मिडियावर व्हिडिओ क्लिप तयार करुन प्रसारीत करावी. उपलब्ध लस ही 100 टक्के सुरक्षित असून त्याबाबत लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा. लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारची गंभीर गुंतागुंत जिल्ह्यामध्ये झालेली नाही त्यामुळे सर्व लोकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यावे. आपण सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिंनी लस घेतली असल्यामुळे आपणच त्यांना चांगल्या पध्दतीने समुपदेशन करु शकता. लसीकरण पूर्ण झाल्यामुळे रोगाचा फैलाव होणार नाही तसेच रुग्ण गंभीर होण्याचे, मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आपले कुटुंब आपल्यावर अवलंबून असल्याने आपण सुरक्षित राहिलो तरच आपले कुटुंब सुरक्षित राहणार आहे. लस नाही घेतली तरी चालेल ही लोकांची मानसिकता बदलने आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध असून 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी ऑफलाईन पध्दतीने लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल अंतर्गत दि. 8 ते 14 या कालावधीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर या ठिकाणी आपले लसीकरण पूर्ण करुन आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे तसेच आपल्या समाजाचे संरक्षण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks