खासदार धैर्यशील माने यांच्यासह चार जणांना शिवसेना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले

टीम ऑनलाईन :
शिवसेनेने प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या संसदेतील दोन नेत्यांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील खासदार अरविंद सावंत यांना मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे तर मुबंई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे.
मागील यादीतील चार नेत्यांना प्रवक्तेपदाच्या यादीत यंदा स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.
अन्य प्रवक्त्यांमध्ये राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू (मुंबई), प्रताप सरनाईक (ठाणे), भास्कर जाधव (रत्नागिरी), विधान परिषद आमदार अंबादास दानवे (औरंगाबाद-जालना), मनीषा कायंदे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे (नागपूर) , संजना घाडी, आनंद दुबे (मुंबई) यांचा समावेश आहे.