हातावर पोट असलेल्या लोकांना पाच हजार द्या मग लॉकडाऊन करा – आ. चंद्रकांतदादा पाटील

मुंबई :
आपल्या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत व नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही, असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मारला. ते म्हणालेत, “पूर्वी राजा वेश बदलून वस्त्यांमध्ये फिरायचा तसं फिरावे लागेल. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरला की तुमच्या सोबत ताफा असेल. त्यामुळे लोक तुमच्याशी लोक मनमोकळं बोलणार नाहीत.
राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरुनही पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना टोमणा मारला. “आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते? ज्यांना फिरायचे असते ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवे असते. सर्व सामन्यांना नाईट लाईफ नको, त्यांना सातच्या आत घरात चालते.