अन्यायकारक करवाढ तत्काळ मागे घ्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार ; मुरगूडमधील जांभूळखोरा येथील नागरिकांचा इशारा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभूळखोरा वसाहतीमध्ये मुरगुड नगर परिषदेने दहा टक्के दरवाढ केली आहे. सदरची अन्यायकारक करवाढ तत्काळ मागे घ्या अन्यथा येणाऱ्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकू, तसेच अधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा या वसाहतीमधील शेकडो नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
मुरगुड येथील जांभुळखोरा या वसाहतीतील नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना महसूल करही भरावा लागतो. या वसाहतीमधील समस्यांकडे पालिका दुर्लक्ष करते व अन्यायकारक वाढीव करपावत्या देतात. यामध्ये मागील थकबाकीपण दाखवली आहे. त्यामुळे ही करवाढ रद्द करून नवीन पावत्या द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
कक्ष अधिकारी स्नेहल पाटील यांच्याकडे निवेदन दिले. समीर गोरुले, धनाजी गोधडे, दत्तात्रय मंडलिक, प्रकाश पाटील, श्रीधर पाटील, तुकाराम पुजारी, आकाराम मेटकर, नारायण गोरुले, आदी नागरिक उपस्थित होते.