#कोरोना_इफेक्ट : कोरोना निर्बंधामुळे मार्च ते मे या कालावधीत होणारे ७० ते ८० टक्के विवाह सोहळे रद्द

मुंबई :
राज्यात करोना संसर्गामध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे राज्य शासनाने विवाह सोहळ्यावर पुन्हा निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे मार्च ते मे या कालावधीत होणारे ७० ते ८० टक्के विवाह रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या सोहळ्यावर अवलंबून असलेले कॅटरर्स, सजावट, मंडप व विद्युत रोषणाई, पत्रिका छपाई व्यावसायिक, सभागृहाचे मालक आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या व्यावसायिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निर्बंधांमध्ये काही बदल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.राज्य शासनाने विवाह सोहळ्यांवर निर्बंध घातल्याने त्याचा व्यवसायावर होत असलेल्या परिणामांची माहिती देण्यासाठी बॉंम्बे कॅटरर्स असोसिएशनने ठाण्यात गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळेस त्यांनी निर्बंधामुळे व्यावसायिकांपुढे उभे राहिलेल्या आर्थिक संकटाबाबतच्या व्यथा मांडल्या. विवाह सोहळ्यांमध्येही मोठी गर्दी होत असल्यामुळे या सोहळ्यावरही पुन्हा निर्बंध घातले आहेत. ऐन लग्न सराईच्या काळातच लग्न सोहळ्यावर निर्बंध घातल्याने यावर अवलंबून असलेल्या ८ ते १० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे.