मुरगूड नगरपरिषदेस ओडिफ प्लस प्लस मानांकन; स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये उत्कृष्ठ कार्य; अडीच कोटींचा निधी मिळणार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिफ प्लस प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे . त्यामुळे मुरगूड नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व विकास कामासाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मार्च अखेरीस मिळणार असून मुरगूड नगर परिषद वॉटर प्लस मानांकन व सेव्हन स्टार मानांकन मिळवण्या साठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुरगूड शहर हागणदारीमुक्त झाल्या बद्दल शासनाकडून पालिकेला मोठी बक्षिसे यापूर्वीच मिळाली आहेत.आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत हागणदारी मुक्त संदर्भात राज्य शासन नियुक्त विशेष पथकाने २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवस मुरगूड शहराची पाहणी करुन अहवाल शासनास सादर केला होता.या पथकाने संपूर्ण शहरातील डिजिटल साधनांच्या माध्यमातून पाहणी केली होती.या सर्वेक्षण अभियानासाठी पालिका सर्व ताकतिनिशी सज्ज होती.त्यामुळेच या अभियानामध्ये हा बहुमान मिळाला आहे.या मानांकनासाठी ५०० गुण दिले आहेत.
नगरपालिकेने जुने पोलीस स्टेशन,जनावर बाजार व मांतग वसाहत याठिकाणी हायटेक सार्वजनिक शौचालये सुरु केली आहेत. या अंतर्गत पाण्याची व्यवस्था , कमोड, हँडवॉश,आरशे,लाईट, बेसिन आदी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच या सार्वजनिक शौचालयाच्या आजूबाजूला उत्कृष्ठ स्वच्छता ठेवली होती.याची शासनाने दखल घेवून मुरगूड शहरास हागणदारी मुक्तीचा ओडिफ प्लस प्लस दर्जा दिला आहे.अशीच आणखी तीन हायटेक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
हागणदारीमुक्तीबद्दल सलग तिसऱ्यांदा मानांकन मिळाल्याबद्दल शहरास लौकीक प्राप्त झाला आहे.यापुढे वॉटर प्लसचा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे व या कामी खासदार संजय मंडलिक ,पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड व पदाधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष हेमलता लोकरे,पक्षप्रतोद संदीप कलकूटकी, नगरसेवक नामदेवराव मेंडके,जयसिंग भोसले, नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी,रुपाली सनगर, भगवान लोकरे,प्रकाश पोतदार,जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर,अमोल गव्हारे, अमर कांबळे, शुभम मोहिते उपस्थित होते.