महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा परिषद शाळा साठी अभिनव उपक्रम ; यमगे येथे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कागल यांच्या वतीने केंद्र शाळा यमगे येथे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये पाच शाळेच्या १०७ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे आणि मनविसेचे कागल तालुका अध्यक्ष शिवतेज विभूते यांच्या योजनेतून जिल्हा परिषद शाळेची पट संख्या सुधारावी आणि शिक्षणाचा दर्जा वाढवा यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे उदघाट्न कागल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस.गावडे तसेच
मनसे कागल तालुका अध्यक्ष सौरभ पोवार यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा हा उपक्रम अगदी प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे असे ते उदघाट्न प्रसंगी म्हणाले.
या शिष्यवृत्ती स्पर्धेतुन प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांला “अमित ठाकरे थाप कौतुकाची” या योजनेतून रुपये २५००/- इतकी दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर पहिल्या पाच विजेत्यांना शालेय उपयोगी साहित्य, विजेता चषक आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मानिय नेते अमित राजसाहेब ठाकरें यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्यात आले. त्याच बरोबर या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला अमित साहेबांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवतेज विभुते यांनी शाळेच्या काही समस्या पदाधिकाऱ्यांसोमोर मांडल्या व शाळेच्या दुरुस्तीसाठी काही निधी मिळेल का अशी विचारणा केली त्या संदर्भात तातडीने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी आपण शाळेसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही ह्या वेळी शाळा व्यवस्थापन कमिटीस दिली.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी शाळेच्या कोणत्याही अडचणीत मनसे समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी गणपती कळमकर , शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस.गावडे , यमगे शाळेचे केंद्रप्रमुख शैलेश पारसेवर केंद्र शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, जिल्हा सचिव वैभव माळवे,कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे राहुल पाटील आदी प्रमुख पदाधिकारी तसेच शुभम कुंभार, दिपक तेली, शंतनू विभुते, सुदेश पेडणेकर, बिरदेव डोणे, विनायक सुळकुडे, कमलेश रंगापुरे आदी प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.