पंढरपूर वारीसाठी एका पालखीसोबत असणार फक्त 40 च वारकरी! पुण्याच्या विभागीय आयुक्तांचे लेखी आदेश!

पुणे :
पालखी सोहळ्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक वारकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी पालखी विश्वस्तांनी केली होती, त्यावरून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालखी विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत शासनाने परवानगी दिल्यापेक्षा अधिक वारकऱ्यांना परवानगी द्यावी व प्रस्थान सोहळ्यात अश्वांना परवानगी द्यावी यावर चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय झाला असल्याने विभागीय आयुक्तांनी पुन्हा शासनाच्या निर्णयानुसार एका पालखीसोबत फक्त 40 जण जातील असे स्पष्ट केले आहे.
कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय टास्क फोर्सने व्यक्त केली असल्याने, त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील मानाच्या दहा पालख्यांना आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी परवानगी दिली आहे.
देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यात प्रत्येकी 100 आणि इतर आठ पालख्यांच्या सोहळ्यासाठी प्रत्येकी पन्नास वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी पादुकांसोबत बसेस राहणार आहे. एका बसमध्ये 20 वारकरी अशा दोन बसमधून 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांची rt-pcr चाचणी केली जाणार आहे.