ताज्या बातम्या

रिक्षांवर बसवण्यात येणाऱ्या रिफ्लेक्टर नियमांमध्ये परिवहन विभागाने कायद्यात सुधारणा न केल्यास आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा : प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, डॉ.स्टिव्हन अल्वारीस यांना आप तर्फे निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोरोनाच्या निर्बंधामुळे अनेक रिक्षाचालक कुटुंब रिक्षाव्यवसाय नसल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. अनेक रिक्षाचालकांनी उदरनिर्वाह होत नसल्यामुळे रिक्षाव्यवसाय बंद केला आहे. काही आत्महत्या सुद्धा झाल्या असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने लागू केलेल्या नवीन रिफ्लेक्टर नियमांमुळे रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने रिक्षा या वाहनाला नवीन रिफ्लेक्टर नियमातून वगळले असताना देखील आपला परिवहन विभाग सुप्रिम कोर्टाचे नाव पुढे करून रोड सेफ्टी कायद्यात रिक्षाला निवडक कंपन्यांचे रिफ्लेक्टर लावण्यासाठी भाग पाडत आहे. असे असताना सुधारित कायद्यात रिक्षाला 20 मिलिमीटर रिफ्लेक्टर टेप बसवणे नमूद केले आहे. पण परिवहन विभाग QR कोड सह रिफ्लेक्टर वर अडून बसले आहे. परिवहन विभागाने ज्या तीन कंपन्यांना मान्यता दिली आहे त्या तिन्ही कंपन्यांकडे 20 मिलिमीटर रिफलेक्टर टेप वर QR कोड उपलब्ध नाहीत. ज्या कंपन्या QR कोडयुक्त रिफ्लेक्टर विकत आहेत त्यांच्याकडे अवजड वाहनांना लागणारे 50 मिलिमीटर रुंदीचे रिफ्लेक्टर आहेत व ते कमीतकमी 10 मीटर लांबीचे विकत घ्यावे लागतील असा कंपन्यांचा आग्रह आहे. यामुळे विनाकारण रिक्षाचालकांना अंदाजे एक ते दीड हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

या कायद्याची चुकीच्या पद्धतिने अंमलबजावणी परिवहन विभागाने कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता केली आहे. तरी शासनाने रिफ्लेक्टर कायद्यात सुधारणा करावी व रिक्षाला QR कोड रिफ्लेक्टर टेपवर मागू नयेत जेणेकरून रिक्षाचालकांची होणारी लूट थांबेल.
ह्या सर्वांचा निषेध करण्यासाठी व ह्या प्रकरणाच्या पडसादाची तीव्रता लक्षात येण्यासाठी मा. प्रादेशीक परिवहन अधिकारी यानां निवेदन देण्यात आले. तसेच परिवहन विभागाने कायद्यात सुधारणा न केल्यास आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आम आदमी रिक्षा संघटनेचे मार्गदर्शक व आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यानी दिला.
यावेळी संदीप देसाई यांच्या सह उपस्थीत पदाधिकारी राकेश गायकवाड, लाला बिरजे, प्रकाश हरणे, विजय भोसले, बाबुराव बाजारी, महेश घोलपे, विशाल वठारे, रामचंद्र गावडे, मंगेश मोहिते,सुभाष भांडवले, संभाजी देसाई, संजय सुर्यवंशी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks