कागल येथे महामार्गावर कार-कंटेनर अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

कागल :
पुणे-बेंगलोर महामार्गावर मारूती ईर्टीगा आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
शनिवारी दुपारी साडेचार वाजता लक्ष्मी टेकडीच्या उतारावर ही घटना घडली. मुंबईतील एका कुटुंबातील काही सदस्य आजोबांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी कारने आंबोलीला चालले होते. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर कार अचानक फास्ट लेनमध्ये घुसून महामार्गाच्या दुभाजकावर गेली. महामार्गावर आडवी थांबलेल्या या कारला फास्ट ट्रॅकमधून चाललेल्या कंटेनरने जोरात ठोकरले.
दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोन महिलांसह तीन तरुणांना लोकांनी कारमधून बाहेर काढले. सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कागल पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक एकेरी केली. तसेच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.