कोल्हापुर :रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने कोरोना झालेल्या माजी सैनिकाचा झाला तडफडून मृत्य

रोहन भिऊंगडे /
कोल्हापूर | रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यानं कोल्हापुरात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील गिरगाव येथील 41 वर्षीय माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचं ऑक्सिजन अभावी निधन झालं. रूग्णालयातील ऑक्सिजन संपल्यानं कुरणे यांना प्राण गमवावे लागल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं.
कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचा शनिवारी सकाळी ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दररोज एक हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात होत आहे. उपचाराअभावी रुग्णांचे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे.
सर्जेराव कुरणे यांनी सैन्य दलात चांगली कामगिरी बजावली होती. सरावादरम्यान त्यांच्या हातात बॉम्ब फुटला होता. अतिशय धाडसी आणि मनमिळावू स्वभावाचे प्रत्येकाच्या अडी-अडचणीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध होते. कुरणे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर रंकाळा टॉवर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावल्यानं त्यांना ऑक्सिजन लावला होता. शनिवारी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्यानं शेजारच्या रुग्णालयातील ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न रुग्णालयातील प्रशासनानं केला.
दरम्यान, रूग्णालय प्रशासनाची हलगर्जी कुरणेंच्या जीवावर बेतल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडं हलवून कुरणेंना ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ऑक्सिजन न मिळाल्यानं कुरणेंना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली. मात्र, शेवटपर्यंत ऑक्सिजन मिळालाच नाही. अखेर तडफडूनच सर्जेराव पांडुरंग कुरणे यांनी प्राण सोडला. तर याबाबतची तक्रार महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.