ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलाठी, ग्रामसेवक आणि मुख्याधिकारी यांनी लसीकरणाचे नियोजन करावे ग्राम, प्रभाग समित्या पुन्हा सक्रिय करा-जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, :रोहन भिऊंगडे

तलाठी, ग्रामसेवक आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी मतदान केंद्रनिहाय लसीकरणाबाबत नियोजन करावे. गावा-गावातील, शहरातील ग्राम तसेच प्रभाग समित्या सक्रिय करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
छत्रपती राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या सर्वांची आज बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. ऊषादेवी कुंभार, तहसिलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी सुरूवातीला सद्यस्थितीबाबत माहिती देवून सूचना केल्या. ते म्हणाले, गृह विलगीकरणात आरोग्य सेवकांच्यामार्फत दैनंदिन तपासणी झाली पाहिजे. पूर्वीप्रमाणेच पल्स ताप याबाबत नोंदी ठेवायला हव्यात. त्याचबरोबर गृह विलगीकरणासाठी घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करायला हवी. घराच्या बाहेर त्याबाबत फलक लावला पाहिजे. गाव पातळीवर ग्राम समित्यांमार्फत संस्थात्मक अलगीकरण कार्यान्वित व्हायला हवं. प्रतिबंधीत क्षेत्रात इली,सारी याबाबत सर्वेक्षण करायला हवे. त्याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन करा.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सरपंच, सदस्य, नगरसेवक, सर्व अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सद्यस्थितीत सुमारे दररोज 38 हजार लसीकरण होत आहे. यामध्ये आणखी लसीकरण केंद्र सक्रिय झाल्यास 45 पुढील सर्वांचे लसीकरण महिनाअखेर पर्यंत संपू शकते.
मतदान केंद्र घटक म्हणून सर्वांनी लसीकरणाबाबत सूक्ष्म नियेाजन करावे. आशा, अंगणवाडी सेविका यांना केंद्र वाटून द्या. तलाठी, ग्रामसेवक इतर अधिकारी यांनीही गावात फिरून लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करावे. स्थानिक सदस्यांना सोबत घेवून ग्रामसेवक, तलाठी यांनी एकत्र नियोजन करावे. लसीकरण केंद्रांवर स्प्रे पंपाव्दारे ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी.लस दिल्यानंतरही संबंधित व्यक्ती दोन-तीन दिवस अलगीकरणात राहील. त्याशिवाय विनामास्क फिरणार नाही याबाबत प्रबोधन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
पुढच्या पाच ते सहा दिवसांचा नियोजन तक्ता तयार करून 45 च्या वरील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याबाबत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी मतदान केंद्रनिहाय नियोजन करावे. त्यासाठी शिक्षक, कृषी अधिकारी अशा इतर विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घ्या. ग्राम, प्रभाग समित्या सक्रिय करून सुविधा उपलब्ध करा. या समित्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे नियोजन, प्रबोधन, संसर्ग वाढू नये यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी, गावातील सभागृह, शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरण सुरू करणे आदी प्रभावीपणे राबवा.
बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तीला 7 दिवस संस्थात्मक अलगीकरण
इतर बाहेरील जिल्ह्यातून गावात येणाऱ्या व्यक्तीला सक्तीने 7 दिवस संस्थात्मक अलगीकरण केंद्रात रहावं लागेल. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र सोय असेल तर त्याची खात्री करून ठेवता येईल. त्यासाठी समितीने सतर्क झालं पाहिजे. कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची, आदेशांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

नियमांचे तसेच आदेशाचे कुणी पालन करत नसेल तर दंडात्मक कारवाई करावी. कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गट विकास अधिकारी, तहसिलदार यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना गावं वाटून द्यावीत. सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचे काम करावे, असेही ते शेवटी म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks