वन विभागाने सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यात वन पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री दीपक केसरकर ; वन विभागाकडून वन अमृत प्रकल्प 40 गावांमधून 400 गावापर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,वन अमृत प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील लोकांचा शाश्वत विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार 40 गावांमधून जवळपास 400 गावांमध्ये करण्याचे नियोजन वन विभागाने केलेले आहे. त्यामुळे वन अमृत प्रकल्प व सह्याद्री संरक्षण मोहिमेसाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
वन विभागाच्या वतीने मौजे मानोली तालुका शाहुवाडी येथे आयोजित वन अमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ मोहीम लोकार्पण सोहळा प्रसंगी पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद श्रीमती वनिता डोंगरे, कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद, मलकापूर परिक्षेत्र वनाधिकारी अमित भोसले, पेंडाखळे परिक्षेत्र वन अधिकारी रवींद्र सूर्यवंशी, वन अमृत प्रकल्प उपजीविका तज्ञ डॉ. योगेश फोंडे, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मौजे मानोलीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात वन अमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ मोहिमेस अधिक मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन या भागाचा शाश्वत विकास होईल. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यात वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी ही वन विभागाने पर्यटन विकासाचा प्रारूप आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात टसर रेशीम उत्पादनासाठी ही मोठी संधी असून वन विभागाने याबाबत योग्य उपायोजना राबवाव्यात. या प्रकल्पाला अधिक चालना मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. या भागातील समृद्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वोत्परी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी देऊन या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
वनविभाग व वन अमृत प्रकल्पात येणाऱ्या गावातील ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिलांमध्ये योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील महिलांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्याचा विस्तार सह्याद्री पर्वत रांगेतील सर्व गावपाड्यापर्यंत व्हावा यासाठी वन विभागाने नियोजन करावे, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
वन अमृत प्रकल्प उपजीविका तज्ञ डॉक्टर योगेश फोंडे यांनी वन अमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ मोहीम लोकार्पण प्रास्ताविक केले. यामध्ये वन क्षेत्रात करवंद, जांभूळ, आंबा, फणस, काजू, कोकम, आवळा, द्राक्ष, तांदळाचे स्थानिक वाण व नाचणी यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून महिला बचत गटाद्वारे केला जाणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात वन अमृत प्रकल्प राबविण्यात येत आहे. सह्याद्री पर्वतरांगातील जैवविविधता संवर्धन व जंगल भागातील लोकांना आर्थिक उन्नतीसाठी या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचेही श्री. फोंडे यांनी सांगितले. यावेळी वन विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनीही या प्रकल्पाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर व मान्यवरांच्या हस्ते वन अमृत प्रकल्प व सह्याद्री रक्षणार्थ चित्रफिताचे उद्घाटन करून मोहिमेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाचा ब्रँड अँबेसिडर गवा याचे कृत्रिम प्रतिमेचे अनावरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट स्थानिक महिलांनी तयार केलेल्या वन ओवी गायनाने करण्यात आले.यावेळी या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते