ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय ; शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी केली जल्लोषाला सुरुवात

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठे यश मिळवले आहे. पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या असून, दादर येथील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.
शिवसेनेतील झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे गटासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत याचा नक्कीच फायदा होणार आहे. सकाळी ८ वाजता अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या पार पडणार असल्या तरी तेराव्या फेरीनंतर लटके यांना ४८ हजार १५ मते मिळाली. तर मतदारांनी नोटाला ९ हजार ५४७ पसंती दिली.
एकूण झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार लटके यांना आतापर्यंत मिळालेल्या मतांचा आकडा बघता त्या विजयी झाल्या आहेत. आता केवळ १९वी फेरी संपल्यानंतर लटके यांच्या विजयाची घोषणा केली जाईल.आतापर्यंत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार ऋतुजा लटके यांचा विजय झाला असून, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात शिवसैनिक एकमेकांना पेढे वाटत आहेत.
पक्षफुटीनंतर शिवसेनेचा हा सर्वांत मोठा विजय आहे. शिवसेनेला उभारी देणारा हा विजय आहे. या विजयामुळे राज्यातील पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात नक्कीच चैतन्य संचारलं आहे. शिवसेनेचे बडे नेते अनिल परब यांनी ऋतुजा लटके यांना बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.