मुरगूड नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना नियमित वेतन द्या : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने कंत्राटी कामगारांचे थकित वेतन अदा करावे व येथून पुढे नियमित वेतन देण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुरगूड नगरपालिकेकडे शकडो सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात पण त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. गेल्या कांही महिन्यापासून वेतन थकले आहे. कंत्राटी कामगारांचे हातावर पोट चालते. त्यामुळे त्यांना नियमित वेतन मिळायला हवे. यासंबंधी पालिकेकडे वेळोवेळी मागणी करुनसुद्धा अनुदान नसल्याने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवले आहे.
कंत्राटी कामगारांचे थकित वेतन ताबडतोब द्यावे. त्यांना नियमित वेतन मिळण्याच्या हष्टीने अनुदानाची तरतूद अगोदरच करण्यात यावी अशी मागणी एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्याकडे केली आहे. शिष्टमंडळात सजैराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, युवराज सुर्यवंशी, तानाजी भराडे, प्रशांत सिध्देश्वर, शुभम वंडकर यांचा समावेश होता.