आरोग्य तपासणीसाठी महिलांनी स्वतःहून पुढे यावे : नवोदिता घाटगे; कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबीरात २०० महिलांची मोफत तपासणी

कागल प्रतिनिधी :
आरोग्य तपासणीच्या बाबतीत महिला फारशा जागरूक नाहीत. त्या आजार अंगावर काढतात . मात्र कॅन्सरसारख्या आजारामध्ये अशी बेपर्वाई जीवघेणी ठरू शकते. यासाठी महिलांनी आरोग्य तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले.
कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन,राजमाता जिजाऊ महिला समिती व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महिला कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबीरवेळी त्या बोलत होत्या.
श्री राम मंदिर समोरील सभागृहात झालेल्या शिबिरात २०० महिलांची तपासणी केली.
शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे , सौ.नवोदिता घाटगे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ रेशमा पवार, प्रमोद माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कॅन्सरमुक्त कागल व कोल्हापूर आमचे ध्येय आहे. कागल नंतर मुरगूड, कापशीसह इतर भागात अशा पद्धतीची मोफत तपासणी शिबीर घेणार आहोत. महिलांमध्ये कॅन्सरबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. कारण महिलांवर कुटुंब अवलंबून असते. त्या स्वतःची काळजी घेत नाहीत. पण दुर्दैवाने असा जर आजार कोणाला झाला तर घाबरून जाऊ नका. राजे फाउंडेशन व कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका रेश्मा पवार म्हणाल्या, महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र जर तपासणी व उपचार प्राथमिक आवस्थेत झाल्यास जीव वाचू शकतो.यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे.अनेक जणांना जीवदान दिले आहे .दररोज किमान तीन महिलांचे कॅन्सरचे निदान होत आहे.ही बाब गंभीर आहे. यावेळी त्यांनी महिलांमधील गर्भाशय व इतर कर्करोगाच्या लक्षणे या बाबत सविस्तर माहिती दिली.
स्वागत डॉ महेंद्र पाटील यांनी केले.आभार नगरसेविका विजया निंबाळकर यांनी मानले.