शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. मात्र सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं, असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या पत्रामुळे राजीनामा द्यावा लागला, पण आज ही परमवीरसिंह अजूनही मोकाट आहेत. परमबीर सिंह यांना रिपोर्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग परमवीर सिंह मोकाट कसे, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केलाय.
भाजपकडून सुडाचं राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.