बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून नव्या वादाला सुरूवात

मुंबई :
दादरच्या शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमावरून आता वाद होताना दिसत आहे. या भूमीपूजनाला सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. यावरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम हे राजसाहेबच करत आहेत, अशीच मराठी माणसांची भावना आहे. आणि तीच भावना महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय याला महत्व नाही, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. राज ठाकरे यांना भूमिपूजनाला न बोलवल्यानं मनसे कार्यकर्ते राग व्यक्त करत आहेत.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. विधान परिषदेचे विरोधीपक्ष प्रविण दरेकर यांनी या कार्यक्रमात विरोधी पक्षाला आमंत्रण दिलं नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना या भूमिपूजनाचं आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, असं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त आहे.
दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेच्या बड्या नेत्यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलेलं नाही. याआधीही बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि अनेक वर्षे तिथं स्मारक न करणं याला टाईमपास म्हणतात, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केलं होती. तर ‘हिंदूहृदयसम्राट’ हा शब्द स्मारकाच्या नावात वापरला नसल्यानं देखील शिवसेनेवर टीका केली जात आहे.